अंतराळात सर्वाधिक काळ (195 दिवस) राहणारी महिला व सर्वाधिक स्पेस वॉक (५० तास आणि ४० मिनिटे) करणारी महिला म्हणजे सुनिता विल्यम्स्. 19 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना अभीष्टचिंतन.
अफाट, अदभूत स्त्री ची कहाणी। घाली गवसणी आकाशाला
इच्छाशक्ती पुढे लाजले गगन। केली संशोधन सौर उर्जा
थोर या नारीचा विश्वात विक्रम। सुनीता विल्यम्स नाव तिचे
राकेश शर्मा पहिला भारतीय अंतराळवीर, अंतराळातून 'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्ता हमारा' असं त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगितल्यानंतर भारतीयांना अंतराळ- स्वप्नं पडायला लागली. ही स्वप्नं पाहणार्या पिढीची प्रतिनिधी म्हणजे कल्पना चावला. तिचा अंतराळ प्रवासातच दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी तिनं स्वप्नं प्रत्यक्षात येऊ शकतात असा विश्वास दिला. या विश्वासाला वास्तवाचं कोंदण दिल सुनीता विल्यम्सनं.
खरंतर सुनीता ही कल्पनासारखी जन्माने भारतीय नाही. पण सुनीताला टिपिकल भारतीय समोसा आवडतो, भगवतगीता आणि गणपतीची मूर्ती घेऊन ती अंतराळात गेली होती या सगळ्या तिच्या गोष्टी भारतीयांना विशेषत: शहरी, मध्यमवर्गीयांना खास जोडून घेणार्या ठरल्या. जागतिकीकरणाचा प्रवाह अनुकूल ठरलेल्या या वर्गाला आताच्या काळात आपल्या मुलीनं लग्न करुन निव्वळ सुखाचा संसार करावा असं वाटत नाही. स्वप्न पाहणार्या भरारी घेऊ इच्छिणार्या मुलीच्या पंखांना बळ देण्याची मानसिकता या वर्गात आता यायला लागली आहे. आजच्या तमाम जागरुक पित्यांना आपल्या मुलीनं सुनीता विल्यम्स व्हावं, सानिया मिर्झा व्हावं असं वाटत असतं. आपल्या मुलीही असं काही बनू शकतात हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण व्हायला या उदाहरणांमुळेच मदत झाली आहे.
सुनिताचा जन्म अमेरिकेच्या ओहायो राज्यातील युक्लिड या शहरात 19 सप्टेंबर 1965 ला झाला. वडील डॉ.दीपक पंड्या 1964 मध्ये भारतातून अमेरिकेत गेले. त्यांची आई उर्सुलून बोनी पंड्या स्लोवेन ही अमेरिकन आहे. तीन भावंडातील सुनिता हे शेंडेफळ. भाऊ जय थॉमस पंडया त्यांच्याहून चार वर्ष तर बहीण डायना तीन वर्षाने मोठे आहेत. सुनीताचे वडील डॉ.दीपक पंड्या यांचे मुळ गाव गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात आहे. त्यांचा जन्म झुलासन या गावात झाला. सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेटस नेव्हल अकॅडेमि कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली
1987 मध्ये सुनिताला अमेरिकन सेनेचे कमिशन मिळाले. 6 महिन्यांच्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर त्यांना बेसिक डायव्हिग ऑफिसर हे पद मिळाले. 1989 मध्ये त्यांनी नेव्हल एअर टे्र्रनिंग कमांडमध्ये शिक्षण घेतले व त्यांची नियुक्ती नेव्हल एव्हिएटर म्हणून करण्यात आली. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टर कॉम्बॅट सपोर्ट स्क्राड्रनचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती विदेशातील अनेक युध्दस्थानांवर झाली. यात भूमध्यसागर, लाल समुद्र, पार्शियन गल्फ. ऑपरेशन डेझर्ट शिल्ड आणि ऑपरेशन प्रोव्हाइड कम्फर्ट यात त्यांनी सहभाग घेतला. 1992 च्या सप्टेंबरमध्ये त्यांना एच 46 या तुकडीच्या ऑफिसर इन्चार्जपदी बढती मिळाली आणि पोस्टींग मियामी फ्लोरिडा येथे झाली. सन 1993 च्या जानेवारीत सुनीता यांनी यु.एस. नेव्हल टेस्ट पायलट स्कूलमध्ये प्रशिक्षक घेण्यास सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला. 1995 मध्ये त्यांची नेमणूक रोटरी विंग डिपार्टमेंटचे प्रशिक्षक म्हणून झाली. यादरम्यान त्यांनी युएच 60, ओएच 6 आणि ओएच 58 यासारखे हेलिकॉप्टर उडवलेत. 1998 मध्ये सुनीया यांची नासाकरिता निवड झाली.
एक अंतराळवीर म्हणून ऑगस्ट 1998 ला त्यांचे प्रशिक्षण सुरु झाले. प्रशिक्षणानंतर 9 डिसेंबर 2006 ला सुनिता यांची डिस्कव्हरी यानातून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जाणार्या टीममध्ये सहभाग झाला. ही अंतराळ यात्रा एक्सपिडीशन 14 ची होती. एप्रिल 2007 मध्ये रशियाचे अंतराळवीर बदलवल्यानंतर ते एक्सपिडीशन 15 झाले. 14 आणि 15 या दोन्ही एक्सपिडीशेन दरम्यान सुनीता यांनी तीन स्पेसवॉक केलेत. त्यांच्या नावावर अंतराळात तब्बल ५० तास आणि ४० मिनिटे चालण्याचा विक्रम आहे. 6 एप्रिल 2007 ला त्यांनी अंतराळातून बोस्टन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि 4 तास 24 मिनिटात ही मॅरेथॉन पूर्ण केली. यामुळे अंतराळात मॅरेथॉनमध्ये धावणारी पहिली व्यक्ती म्हणून सुनिता ओळखली जाऊ लागली. 22 जून 2007 ला सुनिता पृथ्वीवर परतली. सन 2012 मध्ये एक्सपिडीशन 32 आणि 33 मध्ये पुन्हा त्यांचा समावेश करण्यात आला. 15 जुलै 2012 ला त्यांनी अंतराळाकरिता उड्डाण केले आणि 17 सप्टेंबर 2012 ला या एक्सपिडीशन 33 च्या कमांडर झाल्यात. एक्सपिडीशनच्या कमांडर होणार्या त्या दुसर्या महिला आहेत. 19 नोव्हेंबरला त्या पृथ्वीवर परतल्यात.
सुनिता विल्यम्स यांचा विवाह मायकल जे विल्यम्स यांच्याशी झाला आहे. मायकल एक पोलीस अधिकारी आहेत. या दोघांनी हेलिकॉप्टर उडविण्याचे प्राथमिक शिक्षण सोबत घेतले होते. सुनिता विल्यम्स यांना नेव्ही कमेंडेशनल मेडल, नेव्ही अॅण्ड मरीन कॉर्प अॅचीव्हमेंट मेडल, ह्युमैनिटेरियन सर्व्हिस मेडल, मेडल फॉर मेरीट इन स्पेस एक्सोपोरेशन, 2008 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण, 2013 मध्ये गुजरात विश्वविद्यालयातर्फे डॉक्टरेट मानद पदवी, 2013 स्लोवेनियातर्फे गोल्डन ऑर्डर फॉर मेरिट हे पुरस्कार मिळाले आहेत.
अंतराळ वीरांगना कल्पना चावला किंवा मूळ भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स या भारतीय महिलांच्या कामगिरीचा आपणा सर्वांनाच अभिमान आहे.
Comments
Post a Comment