76 वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती

बघता-बघता सात दशकांचा काळ संपला. 76 वर्षापूर्वी मुंबई, महाराष्ट्र आणि सारा देश एका विलक्षण भावनेने मोहरून गेलेला होता. ‘चले-जाव’ या दोन शब्दांत केवढया प्रचंड सामर्थ्यांची प्रचिती येत होती. या शब्दांमागे एक राजकीय चारित्र्य होते. देशभक्ती होती. निर्धार होता. या निर्धाराच्या जोरावर सगळा देश चेतून गेला होता. देशात फोन नव्हते. वीज नव्हती. फॅक्स नव्हते आणि मोबाईलही नव्हते. या सगळ्या भौतिक प्रगतीपासून खूप दूर असलेला, संध्याकाळी ७ वाजले की, अंधारात डुंबून जाणारा ग्रामीण भारत.. त्या देशाला एक विलक्षण प्रकाश महात्माजींच्या रूपाने लाभलेला होता. त्यामुळे आंधळा डोळस होता. पंगू सशक्त होता. देशातले सगळे वातावरण ‘मला देशासाठी काहीतरी केले पाहिजे,’ या भावनेने भारलेले होते. ते सगळे नेते त्याग आणि सेवेचे आदर्श होते.
जगातल्या कोणत्याही स्वातंत्र्यलढयात एकाच वेळी बिनीचे एक डझनभर नेते झालेले नाहीत. नेपोलियन असेल, हो चि मिन्ह असेल, द गॉल असेल, चाऊ असेल, माऊ असेल, नासर असेल, स्टॅलिन असेल, लेनिन असेल.. हे सगळे नेते त्या त्या देशाचे, त्या त्या वेळचे एकमेव नेते होते. त्यांच्या तोडीला त्यांच्या नेतृत्वाएवढीच नेत्यांची प्रभावळ नव्हती. पण, भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींच्या भोवती त्याग आणि राजकीय चारित्र्यावर उभी असलेली एक से एक दिग्गज नेत्यांची फळी डोळे दीपवणारी होती.
गांधी-नेहरू यांच्यापाठोपाठच सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, खान अब्दुल गफार खान, मौलाना अबुल कलाम आझाद, राजेंद्रबाबू, मदनमोहन मालवीय, सरोजिनी नायडू.. किती नावे सांगावीत. 76 वर्षापूर्वीच्या ‘चले-जाव’ चळवळीत रणरागिणीसारख्या चमकलेल्या अरुणा असफ अली, त्या चळवळीचे नेते झालेले डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, युसूफ मेहरअली.. ही सगळी नावे आज आठवली की, अंगावर रोमांच उभे राहतात.
जगाच्या इतिहासातील शक्तिमान सत्तेविरुद्धची अजिंक्य मनांची ती निर्धार लढाई एक वेगळी लढाई ठरली. हातात बंदुका घेतलेले पोलीस आणि त्यांचा प्रतिकार शांततामय मार्गाने करण्यासाठी ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा देत रस्त्यावर उतरलेली जनता.. ‘मला देशासाठी काहीतरी करायचे आहे,’ या जाणिवेने भारलेली ती जनता होती. ‘मला काही मिळवायचे आहे,’ यासाठी ती आसुसलेली नव्हती. मिळवायचे होते ते स्वातंत्र्य.. त्यासाठी एका छोटया मंत्राचा जागर देशभर झाला. तो मंत्र होता- ‘चले-जाव, छोडो भारत..’ जगाच्या इतिहासात अवघ्या दोन शब्दांनी क्रांती केलेली कुठचीही स्वातंत्र्याची चळवळ नाही.
दुसरे महायुद्ध चर्चिलने ग्रेट ब्रिटनला जिंकून दिले, तेव्हा केलेली ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ ही खूण दोन शब्दांचीच होती. पण, तो काही ब्रिटिश स्वातंत्र्याचा अंतिम लढा नव्हता. ‘चले-जाव’ या शब्दांत महात्माजींनी जे सांगितले, त्या शब्दांचे सामर्थ्य अफाट होते. 76 वर्षापूर्वी या भारलेल्या वातावरणात तो बाबू गेनू परदेशी कपडय़ांच्या गाडीपुढे आडवा पडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर स्वत:हून उतरला. ‘तू परदेशी कपडय़ांच्या गाडीपुढे आडवा पड’ हे सांगायला महात्मा गांधी बाबू गेनूच्या घरी गेले नव्हते.
नंदुरबारच्या छोटया शिरीषकुमारने देशासाठी आपल्या चिमुकल्या जीवाचे बलिदान केले. त्याच्या घरीही ‘तू असे कर’ सांगायला कोणी गेले नव्हते. देशात भारलेल्या वातावरणाचा तो परिणाम होता. त्याग, सेवा आणि समर्पण किती उच्च पातळीवर एकाच वेळी खंडप्राय देशात पोहोचू शकते, याचा आदर्श म्हणजे ‘छोडो भारत’ ही चळवळ होती. गांधीजी या चळवळीचे महानायक होते; पण ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये बंदिस्त केल्यावर देशातली जनताच चळवळीची नायक बनली.
बघता-बघता ही चळवळ देशव्यापी झाली. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी उचलून सामाजिक समतेचा एल्गार दिला. १९३० साली साबरमतीच्या किना-यावर मूठभर मीठ उचलून महात्मा गांधींनी राजकीय समतेचा हाकारा दिला. १९४२च्या चळवळीने स्वातंत्र्याची चळवळ आम माणसाच्या मनात पेटवली. जगाच्या इतिहासाने या चळवळींची नोंद घेतली आहे.
स्वातंत्र्याचा असा लढा जगात कुठे झालेला नाही. ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी करपवून टाकले, जे हसत-हसत फासावर गेले, त्या माणसांना व्यक्तिगत जीवनात काही मिळवायचे नव्हते. कोणत्या पदाच्या अपेक्षेने त्यांनी हे केलेले नाही.
ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला, तो १५ ऑगस्ट १९४७चा दिवस! त्यानंतरच्या तरुण झालेल्या दोन-तीन पिढया आणि आताची पिढी यामध्ये कमालीचे अंतर पडत गेले. विचाराचे, संस्कृतीचे आणि चारित्र्याचेसुद्धा! येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन आपण साजरा करू. पण, या वर्षात मोठया झालेल्या दोन-तीन पिढय़ांना स्वातंत्र्याचा लढा काय होता, हे आपण खरोखर सांगितले का? ते सांगितलेले नाही. त्यामुळे आजची कोवळी पिढी एका भलत्या मार्गाकडे जात आहे. त्याला रोखू शकणारा पालक अस्वस्थ असला तरी हतबल आहे.
आजची लहान मुले कोणत्या वातावरणात वाढत आहेत? ग्रामीण जीवनात किती हलाखी आहे? १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा ३० कोटी लोकसंख्येचा हा देश! आज या देशात ३० कोटी लोक दारिद्रयरेषेखाली आहेत. नेमके कोणत्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचे आहे, याचे भान सुटलेले आहे.
माणसासाठी मोबाईल की मोबाईलसाठी माणूस अशी आजच्या तरुणाईची स्थिती आहे. या सगळ्या विपरित परिस्थितीला वळण लावण्याची ताकद पालकांत नाही. वाढत्या स्पर्धेत हतबल झालेला विद्यार्थी असहय झालेला दिसतो आहे. एक टोकाची स्पर्धा विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करीत आहे. चतकोरभर कागदावर घेतल्या जाणा-या परीक्षेतून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ठरवणारी शिक्षण पद्धती बदलावी, असे एकाही शिक्षणशास्त्रीला वाटत नाही. सरकारला वाटण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे ज्या काळात भौतिक सुधारणा काहीच नव्हत्या; त्या काळात घराघरांत जपलेली मन:शांती आज हरवल्यासारखी दिसते आहे. भौतिक सुधारणांना कवटाळून ती मन:शांती मात्र मिळत नाही. तो सद्भाव, स्नेह संपल्यासारखा वाटतो आहे.
जाती-धर्मामध्ये विखार वाढलेला आहे. मिळालेल्या स्वातंत्र्याचा राजकारणी मंडळींनी चोथा करून टाकला आहे. नेतृत्वाची विश्वासार्हता संपलेली आहे. या स्थितीत 76 वर्षापूर्वी या देशाने जो उल्कापात घडविला; ते क्रांतीचे गीत लिहिणारे कुसुमाग्रजही नाहीत आणि ती गीते गाणारी जनताही नाही. त्यामुळे आजच्या दिवशी ‘जिन्हे नाझ है हिंदपर, उन्ही को बुलाओ..’ असे कविराजाच्या शब्दांत म्हणता येईल, पण बोलवणार कोण? आणि येणार कोण?

Comments