किल्ले प्रतापगड
पौराणिक व एतिहासिक संदर्भ लाभलेल महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. ''महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात'' शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ''प्रतापगड''. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वरच्या सानिध्यात असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वर पासून २० कि. मी. अंतरावर प्रतापगड आहे. १६५७ मध्ये मोरोपंत पिगळे यांनी हा किल्ला बांधून घेतला.
!! जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरुनि आ रानमोळी !!
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो.
विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते.
प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास, १६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी 'जावळी' ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खोर्यांत पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ''भोरप्या डोंगर'' एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्यांत आणले. दिनांक ९ नोव्हेंबर १६५९ रोजी दूपारी २ वाजता शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स. १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.
सुरुवातीचा टेहळणी बुरुज पाहून परत किल्ल्याच्या महाद्वारापाशी आपण पोहचलो की येथून पायर्यांची वाट गडावर गेली आहे. या वाटेच्या डाव्या बाजूस सध्या वापरात नसलेली वाट, दूसरा आणि तिसरा दरवाजा आहे. पायर्यां चढून वर गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. येथे काही हॉटेल्स आहेत. श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. मंदिरातील महिषासूरमर्दिनीच्या रुपातील भवानी मातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावरुन आणलेल्या खास शिळेमधून घडवलेली आहे. मंदिरात स्फटीकाचे शिवलिंग आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. या मूर्तीशेजारीच शिवाजीच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या स्नानाचे तळे (नैऋत्य तलाव) व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो.
श्रीभवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायर्यां चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. ह्या खेरीज गडावर वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वराचे मंदिर, घोरपडीचे चित्र असलेली राजपहार्यांदची दिंडी, कडेलोट, सूर्य बुरुज इत्यादी ठिकाणे आहेत.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत..अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे.
प्रतापगड प्रसिध्द आहे ते अफजलखानाच्या वधाने.या विजयाने शिवाजीराजांचा दरारा इतका वाढला की, चार दिशांच्या शत्रूंना नीट झोप लागेना. प्रतापगडाच्या पराक्रमानंतर राजांच्या विजयाचा घोडा चौफेर उघळला आणि यशवंत राजा, किर्तीवंत राजा म्हणून लोकप्रिय झाला. प्रतापगडाची माहिती घेताना या युध्दाविषयी जाणून घेणे अत्यातिक महत्त्वाचे ठरते.
शालिवाहन शके १५७७ मध्ये पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यास जिंकून त्याचा जावळी प्रांत काबीज केला. शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजीला रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता. आता शिवाजीला रोखलाच पाहिजे यासठी बेगम ने दरबार भरवला आणि आपल्या सर्व सरदारांस आव्हान केले कि कोण रोखेल त्या शिवाजीला " कोणीच तयार होत न्हवते…. तेव्हढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला मै लावूंगा शिवाजी को… ! जिंदा या मुर्दा ! सर्व दरबार सुन्न झाला अफलखानाने विडा उचलला आणि तो मोठ्या सैन्यानिशी मराठी स्वराज्यावर चाल करून आला.
विजापूर दरबारात आपल्याला सेनापती अधिकार आणि शिवाजी महाराजांना कैद अथवा मारून टाकण्याचा विडा उचलून अफजल्या वाईकडे यावयास निघाला.- वाईतून मग जावळी प्रांतात आला. शिवरायांचा या आधीचा पराक्रम आणि कोणी अवलियाने (फकिराने) तुझे अनिष्ठ होयील अस सांगताच खान आधीच खचला होता. आपण माघार घ्यायची नाही व बडी बेगमला दिलेला शब्द पाळायचा असा निर्वाणीचा विचार करून त्याने आपल्या त्रेसष्ठ पत्नींना ठार मारले.(क्यारे नावाच्या फ्रेंच प्रवाशाने त्याच्या ग्रंथात त्रेसष्ठ बायका मारल्याचा उल्लेख केला आहे) अफजल्या डोण नदीला डावे घालून पंढरपूर - माणकेश्वर - करंकभोस - शंभूमहादेव - मलवडी - रहमतपूर मार्गे वाई (तुळजापूर - पंढरपूर येथे तुळजाभवानी व पांडुरंगाच्या देवस्थानाचा उपद्रव केला)
अफजल खान येत असल्याची वार्ता या पत्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम समर्थ शिष्य वासुदेव गोसावी यांनी केलेलं आहे, आणि ते सगळ पत्र मोठे गमतीशीर आहे. ते खालील प्रमाणे,
वि॒वेके करावे कार्यसाधन |
जा॒णार नरतनु हे जाणून |
पु॒ढील भविष्यार्थी मन |
र॒हाटोचिं नये॥
चा॒लो नये असत्मार्गी |
स॒त्यता बाणल्या अंगी |
र॒घुवीरकृपा ते प्रसंगी |
दासामहात्म्य वाढवी॥
र॒जनीनाथ आणि दिनकर |
नि॒त्यनेमे करिती संचार |
घालिताती येरझार।
लाविले भ्रमण जगदीशे॥
आ॒दिमाया मूळ भवानी।
हे॒चि जगाची स्वामिनी।
येकांती विवंचना करोनी ।
इष्ट योजना करावी॥
असे पूर्ण सगळं पत्र वाचलं तर सबधं आध्यात्मिक उद्देश आहे. पण पहिली अद्याक्षर पहिली तर “ विवेके करावे कार्यसाधन | जाणार नरतनु हे जाणून ” " विजापूरचा सरदार निघाला आहे " अशा प्रकारे समर्थ रामदासांनी पत्राद्वारे गुप्त राजकारण केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन ते इतक्या अत्यंत प्रभावीपणे करतात, तितक्याच वाईट विशेषणांनी संयुक्त असं अफजल खानाचे हि ते वर्णन करतात. ते पहा,
तुंड हेंकाड कठोर वचनी | अखंड तोले साभिमानी | न्याय नीति अंतःकर्णीं | घेणार नाहीं ||३||
तर्हे सीघ्रकोपी सदा | कदापि न धरी मर्यादा | राजकारण संवादा | मिळोंचि नेणें ||४||
ऐसें लौंद बेइमानी | कदापि सत्य नाहीं वचनीं | पापी अपस्मार जनीं | राक्षेस जाणावें ||५||
दहशतवाद्याच वर्णन करावं तस समर्थ रामदासांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे, आणि त्या माणसाशीं राजकीय चर्चा नको.
राजकारण संवादा | मिळोंचि नेणें ||
दहशतवाद्यांशी राजकीय चर्चा करणार्या राज्यकर्त्यांनी समर्थ रामदासांच्या या वचनापासून बोध घ्यावा इतंक हे मौलिक वाचन आहे. उलट ते म्हणतात,
समयासारिखा समयो येना | नेम सहसा चलेना | नेम धरितां राजकारणा | अंतर पडे ||६||
अति सर्वत्र वर्जावें | प्रसंग पाहोन चालावें | हटनिग्रहीं न पडावें | विवेकीं पुरुषें ||७||
बहुतचि करितां हट | तेथें येऊन पडेल तट | कोणीयेकाचा सेवट | जाला पाहिजे ||८||
त्याचा शेवट झालां पाहिजे. दहशतवादी चर्चा करण्याच्या योग्यतेचे नसतात, ते ठार मारण्याच्या योग्यतेचे असतात. खान आलेला आहे. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. तू त्याला ठार मार. अस समर्थ रामदास या पत्रात स्पष्टपणें लिहितात. भगवान श्रीकृष्णांची राजनीतीची सूत्र या पत्रामध्ये आपल्याला पहायला मिळतात.
वाई येथे अफजलखानशी दोन हात करण्यास कठीण जायील खान जावळीस यावा यासाठी शिवाजी महाराजांनी खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांच्यावतीने खानास निरोप पाठविला " राजा कचदिल आहे, वाईस येवून भेट घेण्यास भितो" हाती आला ससा । तो जावू कसा द्यावा" असा विचार करून खान जावळीस यायला तयार झाला
शिवाजी राजांनीही आपले वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांच्या मार्फत पत्र पाठविले त्यात लिहिले " जैशे शहाजीराजे तैसे तुम्ही, आपण खानाचा भतीजा होय" असा पत्रव्यवहार करून दोघेही एकमेकांना शब्दांचा, पत्रांचा व्यवहार करून खेळवत होते. पण, इकडे शिवाजी महाराज आपली योजना आखत होते तर खान गुर्मीत शिवाजीला कसा ठार मारू याचा विचार करत होता.
भेटीचा दिवस निश्चित करण्यासाठी महाराजांकडे वकील आला त्या दिवशी मार्गशीष शुद्ध पंचमी होती "खानाचे वकील राजीयास जावून भेटले. लौकिक बोलणे जे बोलायचे ते बोलले, एकांती मागती सर्व वर्तमान सांगितले कि आपण बोलल्या प्रमाणे खानास घेवून आलो. आता तुमची त्यांची भेटी एकांती खासे खासे यांची करवितो. तुम्ही हरीफी करून कार्यभाग करणे तो करावा. म्हणोन सांगितले, भेटीस एक दिवस आड करून दुसऱ्यादिवशी दिवशी भेटावे असे केले. राजे गडावरून उतरावे, खानाशी गोठांतून पुढे यावे, उभयतांनी दरम्यान देरे देवून खासे खासे भेटावे" खानास वर्तमान सांगितले व खानानेही ते मान्य केले. खलबताच्या वेळी भेटीचा दिवस एक दिवस आड करून ठरविला. त्याचे कारण - १. दुसरे दिवशी चंपाष्टी होती. २. अफजलखान अजूनही वाई प्रांतात होता त्याला जावळीस यायला वेळ मिळावा. शिवाय अफजलखान व शिवाजी महाराज भेट होणार याची खबर इतर सरदारांत, मुलखांत पोहोचावी, व आपल्या मावळ्यानकडून गुप्त तयारी करून घेण्यास वेळ मिळावा.
गडाच्या खाली डोंगराच्या चढणीवर एक उत्तम सदर तयार करणेस शिवाजी महाराजांनी "अंबाजी रंगनाथ मलकरे यांना पाठवले सैन्य दूर ठेवले होते ते जवळ आणून सरदारांस ठिकाणे नेमुंन दिली. ढवळे घाटात चंद्रगडावर लोक जमवून ठेवले कारण हि जागा अशी आहे कि येथून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो. आणि येथे सैन्य घेवून जाणे खूपच अवघड आहे. अशा प्रकारे इतर उंच उंच ठिकाणी नाकेबंदी केली. आपले सैन्य दिसणार नाही असा झाडी झुडपातून दबा धरून मावळे तयार ठेवले व गडावरून तोफेचा आवाज होताच खानच्या सैन्याची धूळधाण उडवावी असा हुकुम दिला. शिवरायांनी अशी जागा निवडली की सदरेत होणारी मसलत सर्वांना दिसेल, बुरुजावरील तोफ अशी ठेवली कि भेटीचा शामियाना आणि खानाचे सैन्य दोन्ही टप्यात येईल. व सहज दिसतील. अफजल खान शामियाना बघूनच भूलेल अशा शाही थाटात सदर उभारली. डेऱ्यास सोन्याचे चंदाराई कळस लावला (चंदाराई कळस- चंद्रराव मोऱ्यांचा आणलेला) बाजूने मखमली झालर व पडदे लावले. तंबूत एक चौथरा बांधला. हा चौथरा ३३ फुट रुंद आणि ४० फुट लाब असा होता. त्याचे कारण असे कि सदरेच्या परिसरात खानाने पुष्कळ लोक आणायचे ठरविले तर अशक्य होते. व दोन्ही बाजूला तुटलेले कडे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक चौथरा बांधला होता.
मुसलमान बैमान आहे…. कदाचित भेटीच्या वेळी दगाफटका करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना होता त्यामुळे सावधगिरीचा इशारा देवून शिवाजी महाराजांनी " हैबतराव, बालाजी सिलीमकर, बांदल सरदार यांना सैन्य जर जवळ आणून अफजलखानाच्या संपूर्ण सैन्याला चांगलेच घेरले होते. अफजलखान आता चांगलाच चक्रव्युहात सापडला होता. माघारी फिरणेही आता शक्य न्हवत. शिवाजी महाराजांनी खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता. दर बुरजास ५० मावळे, मागील व पुढील बाजूस १०० मावळे, दरवाजावर तसेच कचेरी नजीक तोफा ठेवल्या, तोफांचा आवाज होताच सर्वांनी हुशार व्हावे असा इशाराच देवून ठेवला. भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले
शके १५८१ मध्ये मार्गशीष शुद्ध सप्तमी दिवशी भेटीचा संकल्प ठरला. सकाळी पूजा अर्चा करून शिवरायांनी सर्व विश्वासू सरदाराना एकत्र बोलविले, आम्हाला काही दगाफटका झाल्यास काशीस जावून उत्तर कार्य करावे, धर्म हस्तके व गोदानें सुद्धा दिधली. स्वताची तयारी करताना दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले. राजे आई जीजावूंचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे." सभोवारच्या सरदारांना म्हणाले … " तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे. मातोश्रींचा आशीर्वाद घेवून राजे निघाले ते खानच्या भेटीला.
अफजलखान प्रचंड सैन्यानिशी येत होता हे दिसताच शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खानकडे निरोप पाठविला कि "भेटीसाठी इतके लोक कशाला, राजे आपणाला घाबरतात. इतका जमाव पाहून राजे घाबरून माघारी जातील. व आपली भेट होणार नाही. आपण सोबत एक अंगरक्षक घेवून यावा व बाकीचे लोक परत पाठवावे. खानाला हे पटले व तो पालखीसोबत दोन हुद्देकरी सशत्र, कृष्णाजी पंत, व बरोबर सय्यद बंडा नावाचा पटाईत सरदार होता. खान सदरेजवळ येतोय हे शिवरायांना वरून दिसत होते. खानच्या मनात दगा आहे हे शिवराय जाणून होते त्यांनी तसा सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला होता. प्रतापगडाच्या पलीकडे नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे हे सैन्य घेवून सज्ज होते. तोफेचा आवाज होताच हे खानवर तुटून पडणार होते. गडाच्या भोवती रानभर मावळे पेरले होते. सदरेच्या बाहेर एक रणशिंग घेवून मावळा उभा केला होता. "भेट घडताना माझे काहीही होवूदे पण तू शिंग वाजवून सैन्यास इशारा दे" अस शिवरायांनी त्याला सूचना केली होती. शिंगवाल्याचा इशारा होताच गडावरील तोफ डागावी व तोफेच्या इशाऱ्याने सैन्याने शत्रूवर तुटून पडावे अशी योजना होती.
अफजलखान सदरेजवळ येताच शामियाना पाहून थक्क झाला. खानाने राजांना लवकर भेटावयास असा निरोप पाठवला. राजे गड उतरून आलेच होते. राजेंच्या सोबत विश्वासू जीवा महाला होता. तर खानासोबत त्याचा अंगरक्षक सय्यदबंडा उभा होता. मनासारखे सर्व जुळून आले होते जीवामहाला व संभाजी कावजी राजेंसोबत शामियानाच्या दिशेने निघाले. शिवाजी महाराज शामियाना जवळ येताच त्यांनी सय्यद बंडाला दूर करा. आम्हाला त्याची भीती वाटते खानाने हसत हसत त्याला दूर केला खान मनात खूप खुश होता कि माझ्या अंगरक्षकाला शिवाजी इतका घाबरला तर मला किती घाबरला असेल. खान गुर्मीत शिवाजी राजांकडे पाहत होता. खान म्हणाला हाच का शिवाजी. तेंव्हा राजेंनी हि हा खानच असल्याची खात्री करून घेतली खानाने राजीयांची मुंडी कवटाळून बगलेखाली धरली राजांना थोडे घेरी आल्यासारखे झाले, यावेळी राजेंच्या मनास रामदास स्वामींची आठवण झाली. महाराजांचे मन जरा ठिकाणावर येते न येते इतक्यात खानाच्या कमरेत भली मोठी जमदाड होती. तिचे म्यान टाकून खानाने ती राजीयाच्या कुशीत चालविली. पण राजीयाच्या अंगावर जरीची कुडती होती. त्यावर ती खरखरली अंगास लागली नाही. खानाने दगा केला हे पाहून, मोठ्या हिमतीने सर्व ताकत एकटवून डावे हाती बिचवा होता तो राजांनी खानाच्या हृदयाखाली पोटी मारला. व 'एकांगी करून खानावर तडाख्याचा वार केला. त्या जोरावर एकाच तडाख्यानिशी खानची आतडी बाहेर आली. खान ओरडला "दगा दगा दगा…। इतक्यात खानाचे कृष्णाजी पंत तिथे आले त्यांनी राजांवर वार केला. परंतु तो कारीगार झाला नाही व लागू पडला नाही. इतक्यात राजांनी दुसऱ्याने पट्याचा वार खानवर केला त्याच बरोबर खानची आतडी बाहेर आली. खान पुरा झाला खाली पडला. कृष्णाजी पंतांनी राजांशी पुन्हा लगट केली पण राजेंनी त्यास दूर होण्यास सांगितले. कृष्णाजी पंत निघून न जात भोयांस आत बोलावले व खानाला पालखीत बसवू लागले. तेवढ्यात संभाजी कावजी व जीवा महाला तिथे होते. संभाजी कावजींनी भोयांचे पाय तोडले व खानाची पालखी अडवली. त्यांनी खानाचे मुंडके कापले. इकडे खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा राजेंवर चाल करून आला. वर्मी घाव मारणार इतक्यात जीवा महालांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर कलम केला व राजीयास वाचविले "यावरून एक म्हण प्रसिद्ध झाली "होता जीवा म्हणून वाचला शिवा" [अफजलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर शिवाजी महाराज यांच्या हातून मारला गेल्याचा हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय या समकालीन साहित्यात कोणताच पुरावा नाही ]
खान पडला वार्ता सगळीकडे पसरली, रणशिंग वाजताच तोफेचा आवाज झाला. आणि तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, बाजी सर्जेरावाने जीवाची शर्थ केली. कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही. सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले. "कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते. 'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफजलखानाचा मुलगा फाजलखान कोयना काठाने निसटून जात असता खंडोजी काकडे(खोपडे) या सरदाराचे हाती सापडला. पण खंडोजीने धनाच्या मोहास पडून त्यास सोडून दिले. हि वार्ता राजांस कळताच तात्काळ खंडोजीला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
प्रतापगड युद्धात महाराजांना हजार बाराशे उंट, चार हजार घोडे, तीन लाखांचे जवाहीर, सात आठ रोकड राज्यांच्या खजिन्यात जमा झाली. कापड हत्यारे लुट मिळाली ती निराळीच. अशी हि अफजलखान वधाची गोष्ट शके १५८१ विकारी नाम संवछरी मार्गशीष सप्तमी गुरवारी घडली. राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले. पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले, रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले. पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला. देवीच्या समोरील बाजूस डोंगराचे टोक होते तिथे खानाचे मुंडके पुरल्याचे सांगण्यात येते, नंतर भोवती बुरुज उभारला 'अब्दुल्ला(अफझल) बुरुज ' , शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.
थोड्याच दिवसांनी शिवाजी राजेंनी प्रतापगडावर मोठा उत्साह साजरा केला. आई भवानीने आम्हाला यश दिले म्हणून राजेंनी आपली ती कुलस्वामिनी तिचे दर्शन वारंवार घडावे याकरता गंडकी शिळा आणून एक हुशार कारागीर तुळजापूरास पाठवून तेथील देवीच्या ध्यानाप्रमाणे मूर्ती घडवून घेतली. व तिची प्रतापगडावर मंदिर बांधून राजेश्री मोरोपंत पिंगळे यांच्या पत्नीच्या हस्ते प्रतापगडी स्थापना केली
मराठ्याच्या पोराने पादशाही सरदाराला सबंध गिळून टाकला हि वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. सर्वत्र कीर्तिवंत राजा अशी ख्याती झाली. डोंगरातल्या उंदराने विजापूरच्या वाघाला खाउन टाकला म्हणून बेगम खूपच हताश झाली. विजापूरचे सिंहासन डळमळू लागले. बखरकार सांगतात, अफजलखान मारला गेला हि बातमी चौथ्या दिवशी विजापुरास कळली, ती ऐकताच आदिलशहा ताक्तावरून उठून खेद करू लागला… बडी बेगम अल्ला !! अल्ला !! खुदा ! खुदा ! करून रडत अंग पलंगावर पडली. पुढे तिने तीन दिवस पाणीही ग्रहण केले नाही. इकडे जीजाउंना इतका आनंद झाला कि त्यांना तो त्रैलोक्यात मावेना. औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडून नंतर मोठी खंडणी घेऊन बिनकपड्याचे सोडून दिले होते ! अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले,मराठा सैन्याने कोकणात राजापूर तर घाटावर पन्हाळा,विशालगडा पर्यंत धडका मारल्या ! शिवाजी राजांचा दरारा इतका वाढला कि, चारी दिशांच्या शत्रूंना नीट झोप लागेना. प्रतापगडाच्या पराक्रमानंतर राजांच्या विजयाचा घोडा चौकुर उधळला. आणि यशवंत राजा, कीर्तिवंत राजा म्हणून लोकप्रिय झाला.
प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात.
( संदर्भ - अफजलखानाचा वध . वि. ल. भावे यांच्या पुस्तकावरून हनुमंत स्वामींची बखर, रायगडची बखर, कृष्णाजी अनंत सभासद बखर, शिवदिग्विजय )
Comments
Post a Comment