जनजातीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी 'होळी'

जगाच्या पाठीवर जनजाती समाज हा एकमेव असा समाज आहे, की ज्यात होळी सणानिमित्त समस्त बांधव एकत्र येतात. आज विविध समाजबांधवांना एकत्रीत करण्यासाठी गेट टूगेदर, मेळावे यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.  त्यासाठी निमंत्रण पत्रिका तयार केली जाते. परंतु जनजाती बांधव उदरनिर्वाह करण्यासाठी कुठल्याही राज्यात वास्तव्यास असले तरी होळी सणाला आपल्या गावात किंवा पाड्यात हमखास येतात. त्यामुळे होळीला जनजाती समाज बांधवांचा गेट टूगेदर होतो, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

जनजाती बांधवामध्ये ज्या समाजबांधवांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगति झाली आहे व जे मोठ्या शहरात राहतात असे समाजबांधव होळीला आपल्या समाजबांधवांसोबत एकत्र येऊन त्यांच्या पुढच्या पिढीला संस्कृति, प्रथा, बोलीगीते, नृत्य, पारंपारीक वाद्य, भाषा, चालीरीती, पोशाख  यांची ओळख करुण देतात. संस्कृति टिकवण्यासाठीचे हे एक यशस्वी पाऊल आहे. 

भोंगऱ्या बाजार (गुलाल्या) 

सातपुडा पर्वतातील दऱ्याखोऱ्यात जनजातीय बांधवांमधे पवित्र आणि लोकप्रिय मानला जाणारा सण म्हणजे होळी. होळीच्या एक दिवस अगोदर 'भोंगऱ्या बाजार' (जत्रा) भरतो, याला 'हाट बाजार' किंवा 'गुलाल्या बाजार' असेही म्हणतात. या बाजारात होळीपूजनासाठी लागणारे साहित्य, नवीन कपडे, बुध्याची वेशभूषा साकारण्यासाठी लागणारे मोरपीसाचा टोप, कमरेला बांधण्यासाठी लहान व मोठे घुंगरू, चांदीचे दागिने, टोपली, विविध वाद्य इ. साहित्य मोठ्या प्रमाणात भोंगऱ्या बाजारातून  जनजातीय  बांधव खरेदी करत असतात. या ठिकाणी बावा, घेर, मोडवी, शिकारी, मोरक्या, काली असे बुध्यांचे प्रकार असतात.

होळी मातेला केलेला नवस फेडण्यासाठी बनतात बुध्या..

जनजातीय बांधवांसाठी खुप महत्वपूर्ण व पवित्र मानला जाणारा होळीचा सण असतो. होळीमधे वेगवेगळया प्रकारचे नृत्य, पारंपरिक वेषभूषा या बघायला मिळतात. सर्व जनजाती बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात. नवस करणारी अनेकजण बुध्या बनतात व काही जण 'नारी' वेशभूषा धारण करतात. जनजाती समाजातील स्त्री आपल्या शरीरावर जे चाँदीचे अलंकार वापरते तसेच अलंकार पुरुष बुध्या आपल्या शरीरावर परिधान करीत असतो आणि त्यातच एक महत्वाची व आकर्षक वेषभूषा धारण करणारी व्यक्ती असते तिला "काली" म्हणून ओळखले जाते. 'काली'च्या संपूर्ण शरीरावर काळा रंग लावलेला असतो. हातात लहान सुपडी व लाकडापासुन बनवलेला लहान खुरपा (चाटा) असतो. बुध्यांमध्ये 'काली'ला मानाचे स्थान आहे.

बुध्या बनण्याचा हा नवस साधारण सात ते आठ दिवसाचा असतो. ज्या दिवसांपासून हा उपवास चालू होतो, त्या दिवसापासून बुध्या हे आपल्या घरी जात नसतात. शरीराला पाणी लागू न देने, स्त्रियांना स्पर्श न करने, खाटावर न बसता जमीनीवर बसने, मद्यपान व मासाहार न करणे इ. नियम बुध्या हे पाळत असतात. साधारण सात ते आठ दिवस गावाचा सिमेवर बुध्या राहतात. जणू ते आपल्या गावाचे रक्षण करत असावे. त्यांच्या कमरेला मोठ मोठे घुंगरू व डुवे (तुमडे) बांधलेले असतात. पायात लहान घुंगरू असतात व  हातात ढोलकी असते, त्याला जनजातीय भाषेत खाटे असे म्हणतात.  सगळे बुध्या एकत्रित होऊन आपआपली वाद्य एका तालासुरात वाजवीत नृत्य सादर करतात. ज्या गावात होळी आहे त्या परिसरातील बुध्या होळी जवळ जाऊन वाद्याच्या तालावर नाचतात. आपल्या परंपरेनुसार होळीची पूजा करतात. गावच्या पाटलाच्या नियंत्रणाखाली हा उत्सव साजरा जात असतो. 

होळीसाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या बांबूचा दांडा  जंगलातून आणला जातो. आणलेला होळीचा दांडा महू फुलाचा झाडाखाली ठेऊन त्याचे पूजन करण्यात येते. सोबतच ढोलाची पूजा केली जाते.  होळीच्या दांडा उचलून होळीसाठी केलेल्या विशिष्ट जागेवर आणून  उभारण्यात येते. रात्रभर होळीच्या अवतीभवती झांज, ढोलाच्या तालावर गावातील वरिष्ठ मंडळी त्यांचे गट बनवून आदिवासी गीत सादर करीत नाचत असतात.
"इन दळणे तिन  दोड़ जामु डुलारा लेये "
अशा प्रकारे जनजातीय गीत गात असतात.

भल्या पहाटे होणारे होलिका दहन:

पहाटे पाच वाजता होलिका दहन करण्यात येते. त्यावेळी गावातील पाटील, सरपंच, कारभारी , वरिष्टमंडळी यांच्या उपस्थितित होळी पेटवली जाते. होळीचा दांडा खाली पडणार नाही याची काळजी घेतली जाते. होळीच्या दांडा खाली पडणे अपशकुन मानले जाते. होळीच्या दांडा खाली पडण्याअगोदर त्याला अडवले जाते. "पाल्या" (धाऱ्या) नावाच्या हत्याराने गावातील पाटिल होळीच्या दांडा तोडतात. नंतर उपस्थित सर्व मंडळी एक-एक करुण होळीच्या दांड्याला तोडतात. त्यानंतर मांदल, ढोलकी, खाटा, घेऊन नृत्य करीत पाटलाच्या घरी घेऊन होळीच्या कापलेल्या शेंडाची पूजन केले जाते. होळी दहन झाल्यानंतर नवस, उपवास करणारे बुध्या होळी मातेला गुळ, डाळ्या, हार कंगन, अर्पण  करून आपला नवस फेडतात. त्यानंतर होळीला सातवेळा प्रदक्षिणा घालतात. दुसऱ्या दिवशी  गावात भोंगऱ्या (जत्रा) भरते. 

भोंगर्‍या बाजारात गावातील पाटील, सरपंच कारभाऱ्यांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत पारंपरिक ढोल, मांदल हातात तलवारी, धनुष्यबाण, धाऱ्या इ. शस्त्र घेऊन मोठ्या संख्येने जनजाती बांधव सामील होतात. सोंगाड़े सोंग करत मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी मिरवणूकमध्ये सहभागी होतात.

स्त्रियांचाही असतो पुढाकार:

जनजाती समाजामध्ये स्त्रियांना होळीमध्ये कुठल्याही प्रकारचे बंधने नसतात. त्यांना उत्सव साजरा करताना पूर्ण स्वातंत्र्य असते. स्त्री पुरुष समानतेचे अस्सल उदाहरण आपणास येथे पाहायला मिळते. होळीच्या रात्रीपासून भोंगऱ्या बाजाराचा  दुसऱ्या दिवसापर्यंत जनजाती बांधव आनंदाने व उत्साहाने पूर्ण वातावरणात होळी सण साजरा करतात. होळी मातेला नमन करुन राखेचा टीळा मस्तकी लाऊन होळी उत्सवाचा निरोप घेतात.

भोंगऱ्या बाजाराबद्दल गैरसमज:

भोंगऱ्या बाजाराबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. भोंगऱ्या बाजारातून मूली पळविल्या जातात, लग्न करण्यासाठी जोडपे पळतात, गुलाल लाउन आपला जीवनसाथी निवडला जातो, असे अनेक गैरसमज सोशल मीडियावरती पसरवले गेले आहेत. परंतु, असा कुठलाही प्रकार भोंगऱ्या बाजारात होत नाही. भोंगऱ्या बाजार खऱ्या अर्थाने जनजाती बांधवांची परस्पराबद्दल आपुलकी, स्नेह, जिव्हाळा निर्माण करणारी आदर्श परंपरा आहे. भारतीय समाजातील सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक वारसा जोपासणारे सांस्कृतिक केंद्र म्हणून या उत्सवाकडे बघितले पाहिजे. 

✍🏻 सागर निकवाडे, धडगाव