‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळं मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असं आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलानं आईला बजावून सांगितलं. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावं लागलं. संघ, जनसंघाच्या संस्कारांचं बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्याचं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. दि. 22 जुलै हा त्यांचा जन्मदिवस.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यावर, महाराष्ट्र राज्याचे बावीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची २८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. स्वच्छ प्रतिमा, महाराष्ट्राचा तरूण व उमदा राजकारणी, वेळप्रसंगी चुकीच्या धोरणांवर सरकारला व स्वपक्षातील नेत्यांना व कार्यकतर्यांना धारेवर धरणारे नेते तसंच अभ्यासू व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची आहे.
फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रनं बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावं. त्यांचे वडिल, गंगाधर फडणवीस महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार होते, तर काकू शोभा फडणवीस या युती सरकारच्या काळात मंत्री होत्या त्यामुळे राजकारण व समाजकारणाचे बाळकडू देवेंद्र फडणवीस यांना घरातूनच मिळाले होते.
देवेंद्र फडणवीस यांची १९८७ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसचिव म्हणून निवड करण्यात आली होती. ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील मुहूर्तमेढ म्हणता येईल. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रनं घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’. पुढं हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थानं जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचं. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आलं नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले. कमी वयात महापौर आणि आता मुख्यमंत्रीपदावर त्यांची वर्णी लागली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्वाचे आहेत. देवेंद्र अवघ्या 17 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजेच गंगाधरपंतांचे निधन झाले. त्यानंतर गंगाधरपंतांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकलं. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.
त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. विशेष म्हणजे, 2004 सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.
विधानसभेतही देवेंद्र यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अभ्यासू आणि व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आपली स्वच्छ प्रतिमा कसोशिनं जपली आहे. आजवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा किंवा राजकीय तडजोडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. कदाचित या गुणांमुळेच वयाच्या 44 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचले आहेत. आजवर वयाच्या 37 व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तरूण मुख्यमंत्री आहेत.