लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
येत्या 23 एप्रिल रोजी
जिल्ह्यातील 34 लाखापेक्षा अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ढाकणे यांची माहिती
  जळगाव, दि. 21 - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 03-जळगाव व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून जिल्ह्यात 34 लाख 31 हजार 485 मतदार आहेत. या मतदारांनी लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क स्वयंस्फुर्तीने बजावावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतदान प्रक्रियेच्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार (महसूल) मंदार कुलकर्णी यांचेसह विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  यावेळी बोलतांना डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 14 तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 17 लाख 19 हजार 660 पुरुष,16 लाख 39 हजार 732 महिला तर इतर 93 मतदार आहेत. जिल्ह्यात 7992 सर्व्हिस मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या 15287 मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे 7619 मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्ह्यातील 2111 ठिकाणी 3617 मतदान केंद्र आहेत.या मतदान केंद्रांवर 26136 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिक्षक-1, अपर पोलीस अधिक्षक-2, उपविभागीय पोलीस अधिकारी-11, पोलीस निरिक्षक-27, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उप निरिक्षक-164, पोलीस शिपाई-4494 तर 1392 होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 362 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 36 मतदान केंद्र क्रिटीकल आहेत. निवडणूकीच्या कालावधीत 712 शस्त्र जमा करण्यात आल्याची माहितीही डॉ. ढाकणे यांनी यावेळी दिली.
  निवडणूकीच्या कालावधीत जिल्ह्यात 16 लाख 17 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले असून 43281 लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. तर चाळीसगाव येथील स्थिर निगराणी पथकाने 5 किलो चांदी जप्त केली आहे. आचारसंहिता भंगाच्या 15 केसेस दाखल झाल्या असून त्यापैकी 8 प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे सी-व्हीजिल ॲपवर 45 तक्रारींची नोंद  झाली होती. त्यापैकी 22 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष व उमेदवारांना प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या देण्यासाठी सुविधा प्रणालीद्वारे 92 अर्ज प्राप्त झाले होते.
  जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी 3532 मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटची प्रात्याक्षिक दाखविण्यात आले होते. यामध्ये 5 लाख 20 हजार 636 मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तर 4 लाख 53 हजार 228 मतदारांनी याचा वापर करुन बघितला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रकाणे 11 मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहे.
  जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणूका शांततेय व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी एसआरपीचे 3 प्लॅटून, मध्यप्रदेश पोलीसांचे 3 प्लॅटून, रेल्वे पोलीसांचे 1 प्लॅटून तैनात करण्यात येणार आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी प्रत्येकी एक सर्वसाधारण निरिक्षक, एक खर्च निरिक्षक तर एक पोलीस निरिक्षक व 113 स्क्षूम निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
  लोकसभा निवडणूकीची प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. 22 एप्रिल रोजी निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रानुसार मतदानाचे साहित्य वाटप केले जाणार असून ते दुपारपर्यंत आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदान केंद्रावर  मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, शौचालय, वैद्यकीय उपचारपेटी व बीएलओंची नेमणूकही करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी 6 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.  गर्दीच्या मतदान केंद्रांचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार असून दिव्यांग मतदारांसाठी आयोगाच्या सुचनांनुसार आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही डॉ. ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
  मतदान करणे हा आपला हक्क असून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. असे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले.
000